पायथन म्हणजे काय रे भाऊ?

संगणक एखाद्या सूचनेच पालन नक्की कस करतो हे समजायला आपण त्यातील दोन भाग समजून घेऊ. आपण तयार केलेल्या प्रोग्रॅम ची संगणक एका कोष्ठात नोंद करतो. या भागाला Memory (उ. मेमरी) असे म्हणतात. मेमरी चे अनेक प्रकार आहेत. इथे मात्र आपण त्यावर जास्त चर्चा करणार नाही. संगणकाचा सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे त्याचा Processor (उ. प्रोसेसर). प्रोसेसर हा एका घड्याळा सारखा चालतो. घड्याळाचे काटे जसे दर सेकंदाला जागा बदलतात, तसाच प्रोसेसर देखील आपल्या आंतरिक घड्याळाच्या तालावर एक एक करून सूचना आमलात आणतो. प्रोसेसरचे घड्याळ मात्र एका सेकंदात काही कोटी ठोके देऊ शकत. त्यामुळे प्रोसेसर देखील एका सेकंदाला काही कोटी सूचना अमलात आणू शकतो. प्रोसेसर हा घड्याळाच्या प्रत्येक ठोक्याला मेमरी मधील एका नव्या सूचनेच पालन करू शकतो. काही सूचनांच पालन करायला घड्याळाचे शेकडो ठोके लागू शकतात. या सर्व सूचना मात्र एका कच्च्या भाषेत लिहिल्या जातात.

इथे आपण प्रोग्रामिंग भाषा यांच्यातला फरक बघू. पायथन एक पक्की भाषा आहे. अशा भाषांना High Level Language (उ. हाय लेवल लेन्गवेज) असे म्हणतात. कच्च्या भाषांना Low Level Language (उ. लो लेवल लेन्गवेज) असे म्हणतात. पक्क्या भाषेत लिहिलेले प्रोग्रॅम हे कुठल्याही संगणकावर चालू शकतात. कच्च्या भाषेत लिहिलेले प्रोग्रॅम मात्र ठरावीक निर्मात्याच्याच संगणकावर चालतात. उदाहरण, Intel (उ. इंटेल) कंपनीच्या प्रोसेसर साठी कच्च्या भाषेत लिहिलेला प्रोग्रॅम हा ARM (उ. आर्म) कंपनी च्या प्रोसेसर वर चालणार नाही. अजून एक महत्वाची बाब अशी आहे कि पक्क्या भाषेतल्या सूचनेच पालन करायला तिचा आधी कच्च्या भाषेत अनुवाद करावा लागतो. पक्क्या भाषेतील एका सूचनेचा अनुवाद करायला कच्च्या भाषेत काही डझन ते शेकडो सूचना लिहाव्या लागतात.

समीकरण, हिशोब आणि मूल्य

पायथन भाषेत आपण सोपे हिशोब करू शकतो. उदाहरण

>>> 8 + 3
11

इथे दिसणाऱ्या >>> या चिन्हाला Prompt (उ. प्रॉम्प्ट ) असे म्हणतात. BharatIDE सुरु केल्यावर आपल्याला खाली मध्य भागी हे चिन्ह दिसते. इथे सादर केलेली प्रत्येक सूचना आपण इथे आगत करू शकतो. आपली सूचना नोंद करण्यास आपण 8 + 3 नंतर Enter लिहिलेली की दाबतो. उत्तर म्हणून संगणक हिशोब करून आपल्याला 11 हे मूल्य दाखवतो. अधिक प्रमाणेच आपण अजून काही हिशोबाचे प्रकार बघू. वजा करणे:

>>> 14 - 5
9

गुणाकार करणे:

>>> 5 * 7
35

भागाकार करणे:

>>> 18/3
6.0
>>> 10/4
2.5

वरील दोन उदाहरणात आपल्याला दशांशाचे चिन्ह दिसते. पायथन भाषेला पूर्ण तसेच अपूर्ण अंक ओळखता येतात. पायथन भाषेत मूल्यांचे अनेक प्रकार आहेत.

मूल्यांचे काही प्रकार

पायथन भाषेत मूल्यांचे प्रकार ठरवतात की त्यांचे हिशोब कसे केले जातात. दोन पूर्णांक अधिक, वजा, अथवा गणन केल्यास परिणाम हा देखील पूर्णांकच असतो. हिशोबात मात्र एखादा अपूर्णांक आल्यास परिणाम हा नेहमी अपूर्णांक असतो. तसेच भागाकार केल्यास देखील परिणाम नेहमी अपूर्णांक असतो. उदाहरण:

>>> 2.5 * 4
10.0
>>> 10/4
2.5

पायथन तसेच अनेक इतर भाषांमध्ये अपूर्णांकांचे दोन प्रकार आढळतात. त्यांना floating point (उ. फ्लोटिंग पॉईंट) अर्थात तरंगता बिंदू आणि fixed point (उ. फिक्स्ड पॉईंट) अर्थात स्थिर बिंदू असे म्हणतात. तरंगता बिंदू असलेले अंक यांना आपण यापुढे तरबिंदू असे म्हणू.

पूर्णांकाचे भागफल, बाकी आणि घातांक

आपण आधी बघितले की दोन पूर्णांकांचा भागाकार केल्यास परिणाम हा नेहमी तरबिंदू असतो. जर आपल्याला निव्वळ भागफल हवे असेल तर त्यासाठी पायथन भाषेत एक विशेष चिन्ह आहे. उदाहरण

>>> 31 // 3
10
>>> 30 // 3
10

मात्र,

>>> 30 / 3
10.0

तसेच भागाकार केल्यास बाकी संख्या मोजण्यासाठी पायथन भाषेत % हे चिन्ह वापरले जाते. उदाहरण

>>> 25 % 6
1
>>> 25 % 7
4
>>> 25 % 5
0

गुणाकार सोपे करण्यास अनेकदा घातांकाचा वापर केला जातो. उदाहरण 2 x 2 x 2 = 2 ^ 3 = 8. पायथन मध्ये घातांकासाठी ** हे चिन्ह वापरले जाते. उदाहरण

>>> 2 ** 3
8
>>> 5 ** 3
125
>>> 1.5 ** 4
5.0625

कंस आणि त्यांचे महत्त्व

पायथन भाषेत कंसांचे तीन प्रकार पाहायला मिळतात. हे आहेत साधे कंस ( ), चौकोनी कंस [ ] आणि महीरपी कंस { }. या तिन्ही प्रकारांचे वापर वेगळ्या कारणाने केले जातात. आधी आपण साध्या कंसांचा वापर बघू. आपण अनेक गणितीय क्रिया बघितल्या आहेत. त्यांची चिन्ह + , - , / , * , ** , // , % अशी आहेत. या क्रियांना गणितात वेगळी प्राधान्य आहेत. उदाहरण

>>> 2 + 3 * 5
17

वर दिसून येते की जरी + हे चिन्ह समीकरणात पहिले असले तरी पायथन ने आधी 3 * 5 आणि मग 2 + 15 या क्रिया करून 17 हा परिणाम दिला आहे. जर आपल्याला आधी अधिक आणि मग गुणाकार करायचा सेल, अर्थात प्राधान्य क्रमवारी बदलायची असेल तर आपण साध्या कंसांचा वापर करू शकतो. उदाहरण

>>> (2 + 3) * 5
25

चिन्हांचे प्राधान्य हे असे आहे, पहिला क्रमांक **, नंतर *,/,//,% यांना समान प्राधान्य आणि शेवटी +,-.

चल आणि कोष्ठ

प्रोग्रामिंग मध्ये निव्वळ अंक आणि मूल्यांचा वापर केल्यास प्रोग्रॅम नक्की काय करतो हे समजणे कठीण होते. म्हणून सर्वत्र चल वापरले जातात.

>>> रक्कम = 500

इथे आपण एक नवा चल जाहीर केलाय ज्याचे नाव ‘रक्कम’ आहे. इतकेच नव्हे तर आपण त्याला 500 हे मूल्य जोडले आहे. एखाद्या चलाचे मूल्य तपासायला आपण फक्त त्याचे नाव आगत करू शकतो. उदाहरण

>>> रक्कम
500

आता आपण अजून एक चल जाहीर करू आणि एक सोपा वार्षिक व्याजाचा हिशोब करू.

>>> व्याजदर = 8.0
>>> रक्कम * व्याजदर / 100
40.0

इथे दिसत की परिणाम हा 40.0 आहे. तसेच आपण हिशोब केलेले व्याज हातोहात एक नवीन चल म्हणून जाहीर करू शकतो.

>>> व्याज = रक्कम * व्याजदर / 100
>>> व्याज
40.0

समजा आपण तीन वर्षासाठी साधे व्याज मोजू इच्छितो

>>> मुदत = 3
>>> व्याज = मुदत * रक्कम * व्याजदर / 100
>>> व्याज
120.0

इथे आपण बघतो की सर्व चल हे आपले मूल्य राखून ठेवतात व आपल्याला त्यांचा पुन्हा वापर करता येतो.

चल हे संगणकाच्या कोष्ठात कसे ठेवले जातात हे आपण आता बघू. मेमरीचे माप हे बाईट मध्ये मोजले जाते. प्रत्येक बाईटचा आपला एक पत्ता असतो. अनेकदा दोन अथवा चार बाईट एकत्र एका पत्त्यावर आहेत अस म्हणलं जात. यांना आपण स्थान असे म्हणू. एका स्थानाची लांबी चार बाईट असे आपण समजू. पायथन प्रत्येक चलासाठी एक स्थान राखत. तसेच एखादे मूल्य हे देखील एका स्थानावर आहे असे आपण म्हणू.

>>> क = 4

इथे, 4 हे मूल्य एका स्थानी आहे, त्या स्थानाचा एक पत्ता आहे. क हे एक चल आहे. क चा देखील एक पत्ता आहे, मात्र या पत्त्यावर 4 हे मूल्य नसून, 4 या मूल्याचा पत्ता आहे. हे आपल्याला पुढील आकृती बघून लक्षात येईल. पायथन मध्ये अस नक्की का असत हे आपण पुढे बघू.

चल:
क - 100110
ख - XXXXX
...
...
चल:...
100100 - XXXXX
100101 - XXXXX
100110 - 111001
100111 - XXXXX
101000 - XXXXX
101001 - XXXXX
101010 - XXXXX
...
...
100100 - XXXXX...
111000 - XXX
111001 - 4
111010 - XXX
111011 - XXX
...
...
111000 - XXX...
Text is not SVG - cannot display

चलाचा एकाच समीकरणात अधिक वेळा वापर

>>> गणना = 1
>>> गणना = गणना + 1
>>> गणना
2

इथे आपण गणना या चलाचे मूल्य बदलले आहे. यासाठी आपण एकाच समीकरणात तोच चल दोनदा वापरला आहे. पायथन हे नेहमी समीकरणांची उजवी बाजू आधी सोडवत. वरील उदाहरणात पायथन आधी 1 + 1 असा हिशोब करतो. मग 2 हे मूल्य एका नव्या स्थानावर लिहिले जाते. नंतर 2 च्या स्थानाचा पत्ता हा गणना या चलाच्या पत्त्यावर मूल्य म्हणून लिहिला जातो.

वरील समीकरण हे आपण सोप्या पद्धतीने देखील लिहू शकतो.

>>> गणना = 1
>>> गणना += 1
>>> गणना
2

तसेच आपण उर्वरित क्रिया देखील सोप्या पद्धतीने लिहू शकतो.

>>> गणना *= 3
>>> गणना
6
>>> गणना -= 3
>>> गणना
3
>>> गणना **= 3
>>> गणना
27
>>> गणना /= 9
>>> गणना
3.0